मासे

  • अलवार भरलं पापलेट


हे पापलेट अतिशय नाजूकपणे हाताळावं लागतं- करण्यापासून खाण्यापर्यंत. म्हणून याचं नाव अलवार 
साहित्य
मध्यम आकाराची 2 पापलेटं, आडवा छेट देऊन आणावीत, मागच्या बाजुला छोट्या स्लिटस.
15-20 लसूण पाकळ्या, कोथिंबीर मुठ भरून, खोवलेलं ओलं खोबरं वाटी भरून, मीठ, लिंबू एक मोठं,हळद अर्धा चमचा, दोन मोठे कांदे उभे चिरुन, दोन टॉमेटो दोन भाग करून उभे चिरुन, तेल, बांधण्यासाठी जाडसर ( पुड्याचा) दोरा, फ्रायपॅन विथ लिड, लाकडी कालथा, भातिय/ भातवाढी

कृती
आधी पापलेटं स्वच्छ धुवावीत, पोटाच्या आतले सगळे काढून अगदी स्वच्छ धुवावीत.
मग त्याला अर्धं लिंबू, मीठ, हळद आतून बाहेरून लावून ठेवावं.

खोबरं, कोथिंबीर, लसूण, मीठ सगळे कोरडेच वाटून घ्यावे. छान बारीक चटणी झाली पाहिजे. यात अर्ध लिंबू पिळा, मिक्स करा. आता ही चटणी पापलेटच्या पोटात दाबून भरा. 

मासा हलकेच उलटा करून पलिकडच्या छोट्या चिरांमधेही थोडी चटणी भरा. आता जाडसर दोरा घेऊन सगळा मासा क्रॉसमधे बांधून घ्या.

 हे सगळे किमान अर्धातास झाकून ठेवा. तेव्हढ्यात फुलक्या करून घ्या.

आता पॅन मधे तेल टाकून कांदा ट्रान्सपरन्ट होईपर्यंत परता. आता त्यात टॉमेटो परता.बारीक गॅस करून झाकण ठेऊन एक वाफ काढा.

झाकण काढा. थोडं पाणी सुटलं असेल ते फ्लेम मोठी करून दोन मिनिटं आटवा. आता कांदाटॉमेटोचे दोन भाग करा, एक ताटलीत काढून घ्या. पॅनमधे अर्धे मिश्रण नीट पसरवा. आता त्यात बांधलेले पापलेट ठेवा. बाजुला काढलेले मिश्रण पापलेटवर पसरा. 

झाकण ठेवा. 
मंद गॅसवर पाच मिनिटं ठेवा.
झाकण काढून लाकडी कालथ्याने एक पापलेट हलकेच भातीय (भातवाढण्याचा गोलसर कालथा) वर घ्या अन उलटवा. असे करताना मासा मोडता कामा नये. म्हणूनच तो भातियावर घ्यायचा. भातियावर मासा असताना खालचा कांदाटॉमेटो बाजुला करून घ्या. उलटवलेल्या माशावर तो घाला. 
आता असेच दुसरा मासाही उलटवून घ्या. 
झाकण ठेऊन दोन मिनिटं वाफ काढा.
आता झाकण काढून फ्लेम मोठी करून सुटलेलं पाणी आटवा. पॅन हवं तर नुसतच अलवारपणे हलवा. 
आधी कांदाटॉमेटो नीट परतला की फार पाणी सुटत नाही. पण सुटलच तर आटवून घ्या.
गॅस बंद करून एक पापलेट मोठ्या ताटलीत घ्या. 

कांदाटॉमेटो जरा बाजुला करून कात्रीने दोरे कापून अलवारपणे काढून घ्या. माशाचेे डोक्याकडे जरा जास्त भाग ठेऊन दोन भाग करा. स्टिलच्या जाड कालथ्याने झटक्यात जोर देऊन माशाचे दोन भाग कराता येतात. आणि एक एक भाग प्रत्येकाला वाढा. सोबत पॅनमधला राहिलेला कांदाटॉमेटोही वाढा. थोडी जास्तीची चटणी पानात वाढा.
खाताना मध्यात आडवा सलग काटा असेल लक्षात ठेवा. मासा, कांदाटॉमेटो, चटणी यांची एकत्र चव अफलातून लागते. 
हे सगळच प्रकरण अलवार आहे. करताना आणि खातानाही अतिशय नाजुकपणे हाताळावं लागतं. बहुदा म्हणूनच हॉटेलमधे हा प्रकार मला अजून तरी कुठे दिसला नाही. 
खाणारा खवय्या असेल तर आखा मासा वाढायलाही हरकत नाही.
हा नुसता खाल्ला तरी चालतो. हवं तर फुलकी पण सोबत द्या.

सर्व्हिंग्ज 4
ही फार वेगळी टेस्ट असल्यानेे डेव्हलप व्हायला वेळ लागतो. तेव्हा सुरुवात चौघात एकाच पापलेट ने करा. नंतर प्रत्येकी एक आखंही खालच.

  • भरला मासा 

 लागणारे जिन्नस :  पापलेट/ सुरमयी/ बांगडा/ जीताड/ रावस, असा कोणताही मासा अडवा चीर देऊन ( मासे आणताना मासेवाल्याला सांगा भरला करायचा आहे, तो योग्य पद्धतीने चीर देतो ), लसून ८-१२ पाकळ्या, २ मिरच्या, कोथिंबीर, खोवलेला नारळ , हळद १/४ चमचा, लिंबाचा रस २ चमचे, मीठ चवी नुसार, मासा बांधायला पुडाचा दोरा,  २ चमचे तेल. 

मासा  आतून, बाहेरून स्वच्छ धुवा, निथळत ठेवा. त्याला हळद, थोडे मीठ आणि लिंबाचा रस हे चोळून ठेवा.
आता खोबरे, मिरच्या, लसून, कोथंबीर, मीठ ह्याची हिरवी चटणी करा. पाणी अजिबात घालु नका.
आता ही चटणी माशाच्या पोटात भरा ( आडवी चीर दिलेल्या भागात). आता पुडाच्या डॉ-याने हा मासा X  आणि  | असा बांधून घ्या.
साधारण १० मिनिटांनी पॅन मध्ये २ चमचे तेल टाकून गरम करायला ठेवा. पॅन गरम झाले की आच मंद करा.  त्यावर हा बांधलेला मासा ठेवा. झाकण ठेऊन ५-७ मिनिटे ठेवा. नंतर झाकण काढून भातीय ( भात वाढायचे ) घेऊन त्यावर अलगद मासा घ्या, दुस-या उलथन्याने हळूच उलटा करून पॅन वर टाका. पुन्हा झाकण ठेऊन ५-७ मिनिटे ठेवा, झाकण घाला.
आता आच बंद करा. हळूच प्लेट मध्ये मासा घ्या. कात्रीने वरचा दोरा कापून टाका, तो प्लेट मधून बाजूला काढा, आणि ताव मारा भरल्या माशावर !


  • भाजूक तुकड्या

    लागणारे जिन्नस :  पापलेट/ सुरमयी/ बांगडा/ जीताड/ रावस, अशा कोणत्याही माशाच्या  ७-८ तुकड्या , लसून ८-१२ पाकळ्या- वाटून, हळद १/४ चमचा, तिखट १/२ चमचा , चिंचेचा कोळ-घट्ट २ चमचे, मीठ चवी नुसार, वरून लावायला बारीक रवा,  २ चमचे तेल. 

    कृती : प्रथम मासे स्वच्छ धुवून निथळावेत. त्याला रवा आणि तेल सोडता सर्व मसाला लावून ठेवावा. किमान अर्धा तास तरी मेरीनेत करावे.
    आता नॉनस्टिक पॅन मंद आचेवर तापवावे . गरम झाला की त्यावर २ चमचे तेल सगळीकडे पसरावे. आता माशाची प्रत्येक तुकडी बारीक रव्यात घोळवून तव्यावर टाकावी. त्यावर झाकण ठेवावे. आच मंदच ठेवा. ३-४ मिनिटे झाली की हळुवार पणे तुकड्या उलटवा. पुन्हा झाकण ठेऊन ३-४ मिनिटे ठेवा. आता झाकण काढून ३-४ मिनिटे तसेच थवा. नंतर हलक्या हाताने तुकड्या उलट्या करा. आच बंद करा. ५ मिनिटे तुकड्या पॅन वरच राहू देत. पाच मिनिटांनी लगेच खायला घ्या. तयार आहेत भाजूक तुकड्या !

     

  •  सोड्याची खिचडी 

लागणारा वेळ :

४५ मिनिटे

लागणारे जिन्नस :

सोडे एक मूठ ( सोडे म्हणजे वाळवलेल्या मोठ्या कोलंब्या. मुरुड, अलिबाग,  म्हसाळ इथले सोडे प्रसिद्ध आहेत. मला  म्हसाळ इथले जास्त आवडतात. )
बासमती तुकडा ( किंवा जो आवडत असेल तो सुता होणारा तांदूळ ) दोन वाट्या
सुके खोबरे किसलेले एक मूठ
कांदे उभे चिरून दोन
लसून ८ ते १० पाकळ्या
एक हिरवी मिरची
५-६ लवंगा , दोन दालचिनीचे तुकडे
हळद, तिखट, मीठ चवीप्रमाणे
तेल
ओलं खोबरं, किठीम्बीर, लिंबू वरून
तळलेले पोह्याचे पापड अन गव्हाच्या कुरडया सोबतीसाठी 

क्रमवार कृती :

प्रथम सोडे पाण्यात भिजत घालावेत. ५-१० मिनिटांनी सोडे जरा भिजतात. मग त्याचे कात्रीने/सुरीने दोन तुकडे करावेत. पुन्हा पाण्यात भिजत ठेवावेत.
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
चिरलेला उभा कांदा कढईत दोन चमचे तेलावर; तपकिरी होई पर्यंत परतून घ्यावा. तो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावा.
पुन्हा एक चमचा तेल कढईत घेऊन त्यात किसलेले सुके खोबरे, लवंगा, दालाचीनीचा एक तुकडा, ६-७ लसून पाकळ्या हे सगळे लालसर रंगावर परतून घ्यावे. आता हेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यावे. हे वाटण छान गुळगुळीत वाटून घ्यावे.
सोडे पाण्यातून काढून निथळत ठेवा.
आता एका भांड्यात अधाणासाठी चार वाट्या पाणी गरम करत ठेवा.
दुसरीकडे लगडीत (जाड बुडाच्या पसरटत भांड्यात) ५-६ चमचे तेल घेऊन ती आचेवर ठेवा. आच बारीक ठेवा. तेल गरम झाले कि त्यात उरलेल्या लसणाच्या पाकळ्या चेमटून टाका. लसून छान काळा  झाला की त्यात एक दालाचीनिचा तुकडा टाका. आता लगेच सोडे फोडणीत टाका. आच मध्यम ठेवा. २-४ मिनिटं परता. सोड्याचा घमघमाट पसरेल. काहींना हा वास सहन होत नाही, आमच्या पोटात मात्र भुकेने खड्डा पडू लागतो :)
सोडे छान परतले कि त्यात तांदूळ टाका. पुन्हा ५-७ मिनिटं परता.
आता त्यात हळद, तिखट टाका. पुन्हा २ मिनिटं परतावा.
आता त्यात वाटण टाका. ७-८ मिनिटं परता. सगळ्याला तेल सुटायला हवे.
आता आधाणाचे पाणी यात टाका. लागले तर अजून पाणी घाला. एक उकळी आली कि त्यात चवीपुरते मीठ टाका. आच मंद करा. खिचडीला भोकं पडू लागली कि झाकण ठेवा. ८-१० मिनिटं छान शिजू द्या.   
वाढताना खिचडीची मूड, त्यावर ओलं खोबरं, त्यावर कोथिंबीर अन त्यावर साजूक तूप वाढा, सोबत लिंबाची फोड ठेवा. सोबत तळलेले पोह्याचे पापड, गव्हाच्या कुरडया, वा ! मनसोक्त खा सोड्याची खिचडी.  

1352271872679.jpg

वाढणी/प्रमाण:

चौघांना पुरावी

अधिक टिपा:

ज्यांना सुक्या माशांची सवय नाही. त्यांनी सोडे परतत असताना इतर दारं, खिडक्या उघडी ठेवावीत. एक्झॉस्ट चालू ठेवावा. मुख्य दार मात्र आवर्जून बंद ठेवा. कारण न खाणा-यांना हा असा भयाण वास तुमच्या घरातून येतो हे कळणार नाही अन खाणारे लोक तुमच्याकडे जेवायला टपकणार नाहीत स्मित भरपेट जेवणं झाल्यावर निवांत दुपारच्या गप्पांत " काय भयाण वास पसरला होता ना सकाळी" यावर सुखाने चर्चा करा डोळा मारा

खास नंदनच्या फर्माईशी वरून

माहितीचा स्रोत:

सी. के. पी. पदार्थ  

     

  • डांबवणी

लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
आंबाडी सुकट निवडलेली १ वाटी ( अंबाडी सुकट म्हणजे वाळवलेल्या थोड्या मोठ्या कोळंब्या. त्याचे डोके, शेपूट, पाय काढणे = निवडणे )
शेवग्याच्या दोन भरलेल्या शेंगा
कांदे २
लसूण ८-१० पाकळ्या
तेल ४ चमचे
चिंचेचा घट्ट कोळ ३ चमचे
हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर चवी प्रमाणे
क्रमवार पाककृती:
प्रथम निवडलेली सुकट कोमट पाण्यात भिजत घालावी. शेवग्याचा शेंडा बुडखा काढून त्याचे ३-४ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. सालं काढू नयेत.
कांदा बारीक चिरून घ्यावा.
भांड्यात तेल तापवत ठेवावे. त्यात लसूण चेमटून घालावा. गॅस बारीकच ठेवा. सुकट पाण्यातून काढून पिळून त्यातले पाणी काढून टाकावे. लसूण अगदी काळा झाला की ही सुकट तेलात घाला. लगेच शेवगा आणि कांदा घाला. हळद, तिखट टाका. चांगले परता. आता त्यात २ वाट्या पाणी घाला. उकळी आली की झाकण ठेवा. ५-१० मिनिटात शेवगा शिजला की त्यात चिंचेचा कोळ अन मीठ घाला. लागले तर थोडे पाणी घाला. डांबवणी जरा सरसरीतच असावी. उकळी आली की कोथिंबीर घाला. तयार आहे डांबवणी.
वाढणी/प्रमाण:
चौघांना पुरावी.
अधिक टिपा:
डांबवणी जरा झणझणीतच चांगली लागते.
चपाती पेक्षा भाकरी किंवा भाताबरोबर फर्मास लागते.
बाहेर पडणारा पाऊस, गरमागरम भात, डांबवणी अन पोह्याचा भाजलेला पापड ! एकदम भारी !
माझी सख्खी मैत्रिण सुनिता तिच्या हातची डांबवणी जास्त फर्मास लागते
फोटु नंतर.
माहितीचा स्रोत:
सख्खी मैत्रिण. हा प्रकार कोकणातला आहे.
______________________________________________________________________
  • भुजणं

लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कोळंबी सोडून इतर कोणतेही मासे. इथे मी ३ बांगडे घेतलेत.
लसणाची एक गड्डी
२ लिंबांइतक्या चिंचेचा कोळ( बांगडा जरा हरवस-स्ट्राँग असतो, म्हणून जास्ती, अन्यथा निम्मा.)
तिखट २ चमचे
मीठ चवी प्रमाणे
हळद १/२चमचा
कांदे २
बटाटे २
तेल २ चमचे
क्रमवार पाककृती:
मासे स्वच्छ धुवून त्याला हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, लसूण वाटून लावुन ठेवावे.
बटाट्याची साले काढून त्याच्या जरा जाड चकत्या कराव्यात.
कांदे उभे चिरुन घ्यावेत.
जाड बुडाचे पसरट भांडे ( लगडी) किंवा फ्रायपॅन मध्ये तेल टाका. त्यावर बटाट्याचे काप पसरा. तळ पूर्ण झाकला गेला पाहिजे. आता त्यावर कांदा पसरा.
आता त्यावर मसाला लावलेले मासे ठेवा. घट्ट बसणारे झाकण लावा, त्यावर जड वजन जसे बत्ता/ जाड तवा ठेवा. वाफ बाहेर जाऊ नये यासाठी.
आता हे भांडे मंद आचेवर ठेवा. साधारण १५ मिनिटांनी झाकण काढून अगदी हलक्या हातांनी फक्त मासे पलटवा. पुन्हा झाकण, त्यावर वजन ठेवा.
१० मिनिटांनी गॅस बंद करा. झाकण इतक्यात काढू नका.
पानं घ्या.
आता झाकणावरचे वजन काढा. झाकणासह भांडे टेबलावर आणा.
आता झाकण काढा. वाढताना मासा, खालचा कांदा अन खरपुस बटाटा असे एकत्र उचलून वाढा. गरम चपात्या, भाता बरोबर फस्त करा 
वाढणी/प्रमाण:
तिघांनी पुरवून पुरवून खावा :-)
अधिक टिपा:
भात, सोलकढी बरोबर भुजणं ! अप्रतिम सुंदर. दिसायलाही अन चवीलाही
माहितीचा स्रोत:
पारंपारिक सीकेपी पदार्थ
1339739603977.jpg
__________________________________________________________________________
  • लिप्ती कोळंबी

लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोठी कोळंबी १/२ किलो
कांदे ३
लसूण १५ पाकळ्या
तिखट २ चमचे
हळद १/२ चमचा
मीठ चवी प्रमाणे
तेल २ चमचे
चिंचेचा कोळ (एका लिंबा एव्हढी चिंच पाण्यात भिजवून काढलेला घट्ट कोळ)
क्रमवार पाककृती:
६-७ पाकळ्या लसून बाजूला ठेऊन बाकीचा लसूण मिक्सरमध्ये वाटून घ्यावा.
कोळंबी निवडून स्वच्छ करून; फार मोठी असेल तर त्याचे ३-३ तुकडे करून त्याला हळद, तिखट, मीठ, वाटलेला लसूण लावून बाजूला ठेवावी.
कोशे असतील तर तेही स्वच्छ धुवून त्यालाही हळद, तिखट, मीठ, वाटलेला लसूण लावून बाजूला ठेवावे. ( कोशे म्हणजे कोळंबीचे तोंड. खवय्यांना त्याचा रस फार आवडतो. शाकाहारी लोकहो क्षमस्व ! )
कांदे बारीक चिरावेत.
चिंचेचा कोळ काढून ठेवावा.
कढईत तेल तापत ठेवावे. त्यात ६-७ पाकळ्या लसूण ठेचून टाकावा. लसूण काळा झाला ( हो काळा झाला कीच ) त्यात आधी कोशे टाकावेत. चांगले परतावे.
आता त्यात कोळंबी टाकावी छान परतावी. गॅस मोठाच ठेवावा.
कोळंबीला सुटलेला रस कोरडा झाला की त्यात चिरलेला कांदा टाकावा. आता चांगले परता.
आता त्यात चिंचेचा कोळ घालावा. परत थोडे परतावे.

मग त्यात २ वाट्या पाणी घाला. उकळी आली की गॅस बारीक करून ५ मिनिटं झाकण ठेऊन शिजवावे. तयार आहे लिप्ती कोळंबी ! चला बसा जेवायला स्मित

1338734492655.jpg
वाढणी/प्रमाण:
चौघांना पुरावी.
अधिक टिपा:
फुलक्या, किंवा भाताबरोबर मस्त लागते. यात फक्त लसूण अन चिंच असल्याने कोळंबीचा स्वतःचा स्वाद खुप छान लागतो.
माहितीचा स्रोत:
पारंपारीक सीकेपी पदार्थ

__________________________________________________________________________

No comments:

Post a Comment