Saturday, September 2, 2017

डाळढोकळी

साहित्य:
एक वाटी तूरडाळ, अर्धी मूठ मूगडाळ
कणीक एक वाटी
तिखट, हळद, मीठ, हिंग, तेल
गूळ लिंबा एव्हढा
चिंच अर्ध्या लिंबा एव्हढी तिचा कोळ
ओवा छोटा चमचा
दोन लवंगा
कृती:
दोन्ही डाळी एकत्र करून धुवून थोडं जास्त पाणी आणि थोडी हळद, हिंग आणि चमचाभर तेल टाकून कुकरमधे नीट शिजवून घ्यावी. कुकर गार झाला की लगेच रवीने एकजीव करून घ्यावी. मोठ्या पातेल्यात ही डाळ आणि त्यात दोन पेले पाणी घालून उकळवत ठेवा.
आता कणिक, हळद, तिखट, मीठ, तेलमिक्स करून पाणी घालून पोळ्यांसारखी कणीक भिजवावी.
डाळीमधे गूळ, चिंचेचा कोळ, मीठ, तिखट घालून उकळवत ठेवा. उकळी आली की गॅस बारीक करा. हे सगळे सरसरीतच असू दे.
आता कणकेचे गोळे फुलक्यांसारखे पांतळ लाटा. पोळीला वरून, खालून तेलाचा हात फिरवा. मग कातणीने शंकरपाळ्यासारखे काप करा आणि ते उकळत्या डाळीच्या पाण्यात सोडा( हे म्हणजे ढोकळी) अशा किमान 6-8 पोळ्यांचे काप डाळीत घाला. एक लक्षात ठेवा, काप घालत असताना डाळ चांगली उकळती असायला हवी. आवश्यक तेव्हा गॅस मोठा, लहान करा. सगळे काप घातले की हवे असेल तर पाणी अजून वाढवा.
आता गॅस बारीक करून घट्ट झाकण लावा. 5 मिनिटं डाळढोकळीला दमदमीत वाफ येऊ द्या.
आता छोट्या लोखंडी कढईत 4 चमचे तेल गरम करत ठेवा. त्यात चमचाभर ओवा घाला, तो तडतडला की त्यात दोन लवंगा आणि चिमुटभर हिंग टाका, गॅस बंद करा अन ही फोडणी लगेच डाळढोकळीच्या भांड्यात ओता. शक्यतो कढईही बुडवा. आता डाळढोकळी नीट खालून हलवा. आणि पुन्हा एक वाफ येऊ द्या. तयार आहे गरमागरम डाळढोकळी!
स्त्रोत: नवसारीचे आजोळ

नारळीभात

साहित्य:

एक पूर्ण खोवलेला नारळ

दोन वाट्या तांदूळ, शक्यतो बासमती तुकडा किंवा सुरती कोलम

किसलेला गूळ दोन वाट्या ( फार गोड हवा असेल तर प्रमाण वाढवा)

लवंगा 2-4

जायफळ किसून अर्धा चमचा

सात आठ भिजवून सोलून तुकडे केलेले बदाम

कृती:

तांदुळ धुवून निथळत ठेवायचे.

नारळ खवणून मिक्सरमधून एक वाटी पाणी घालून वाटून घ्यायचा. मग त्यातलं दूध पिळून काढायचं. हे जाड दूध. मग पुन्हा चोथ्यात एक वाटी पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं. मग पिळून दुध काढायचं अन चोथा बाजुला ठेवायचा. हा चोथा भातासाठी वापरणार नाही आहोत. त्याचा उपयोग शेवटी सांगते. तर हे दुसरं दूध पांतळ दूध. दोन्ही दुधं स्वतंत्र ठेवा.

आता तुपावर दोन लवंगा टाकायच्या. गॅस बारीक ठेवा. त्यात बदामाचे काप घाला. बदामाचा खमंग वास आला की त्यात तांदूळ टाकायचे. छान लालसर परतून घ्यायचे. मंदाग्निवर.

आता त्यात नारळाचे पांतळ दूध टाकायचे. आणि गॅस मोठा करून छान रटरटू द्यायचं. आता गॅस बारीक करून जाड दूध टाकायचं अन झाकण ठेऊन भात बोटमोड्या शिजवून घ्यायचा.

भात पूर्ण शिजला की,भांड्या खाली तवा ठेवा. तांदळाच्या समप्रमाणात किसलेला गूळ टाकायचा, जायफळ किसून घालायचं. आणि उलथण्याच्या उलट्या बाजुने हलवायचा, नाजूकपणे. जसजसा गूळ वितळत जाईल तसतसे हे हलवणं सोपं जाईल. गूळ सगळीकडे मिसळला की पुन्हा झाकण घालून एक वाफ येऊ देत.

तयार आहे नारळी भात. यात नारळाचा चोथा नसल्याने हा भात अतिशय सुरमट होतो. दुसऱ्या दिवशी हा नारळीभात अफलातून लागतो :)

Saturday, July 29, 2017

मूगाच्या बिरड्याची पूर्वतयारी


 परवा रात्री मूग भिजवले. काल सकाळी उपसून ठेवले. काल रात्री बांधून ठेवले. आज सकाळी त्यांना छान मोड आले, ते असे
पाणी कोमट करून त्यात हे मूग घातले. अगदी हलक्या हातांनी जरा चोळले.
आता सगळे मोठ्या वाडग्यात टाकले अन त्यावर चाळणी दाबून ठेवली पाच मिनिटं ठेवा.
आता चाळणी बाजूला ठेवून 2-4 दा वाडगा ते भांडं असं हे सगळं कॉफी जशी वरखाली करत ओततो, तसं करा. मग वाडग्यावर चाळणी ठेऊन भांडं हलकेच हलवत हलवत वर आलेल्या सालांसकट पाणी ओतत रहा. ही प्रोसेस अगदी हळू करा. 
भांड्यातले पाणी संपले की चाळणी बाजुला करून वाडग्यातले पाणी पुन्हा भांड्यात उंचावरून टाका, पुन्हा वरचीच प्रोसेस करा. असे करत बरीचशी सालं आणि थोडे मूगही चाळणीत येतील. हे बघा असे, दऱियामें खसखस ; )
आता दरियातून खसखस बाजुला करा.
उरलेले बरेचसे शुभ्र मूग असे भांड्यात राहिले असतील.
आता हे मूग ताटात घ्या, शेजारी गाणीबिणी लावा अन सगळे मूग सोला. ही सालं आता खरंतर अगदी अलवार झालेली असतात. अगदी बोट लावलं तरी सुटून येतात. तुमचा हात ओला असू दे. प्रत्येक हिरव्या मूगाला हात लावत जादूने त्याला शुभ्र पांढरे करत जा.
अन बघा तुमच्या हातांची जादू!  ताटभर शुभ्र मोतीच मोती  :)