Wednesday, August 8, 2012

मसूरची आमटी उर्फ व्हेज मटण ;)

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
भिजवून थोडे मोड आलेले मसूर एक वाटी
सुके खोबरे किसून पाव वाटी
कांदे ४
तेल ४ चमचे
तिखट १ चमचा
हळद १/४ चमचा
हिंग चिमूटभर
धणे १ चमचा
दालचिनीचे एक इंचाचे तीन तुकडे
लसून ५ पाकळ्या
आलं अगदी छोटा तुकडा
कोथिंबीर
चिंच २ बुटुक
मीठ चवीपुरते
क्रमवार पाककृती:
मसूर आधल्या दिवशी ४ वाजता भिजत घालावेत. रात्री उपसून फडक्यात बांधून ठेवावेत. सकाळी निवडून घ्यावेत.
३ कांदे उभे चिरून घ्यावेत. १ कांदा बारीक चिरून घ्यावा.
तळके वाटण * : कढई तापवावी. त्यात उभा चिरलेला कांदा टाकावा. थोडा परतला की १ चमचा तेल टाकून परतावा. त्यात आलं, लसूण चिरून टाकावा. १ चमचा धणे टाका. १ दालचिनीचा तुकडा टाका. चांगला ब्राऊन रंग होई पर्यंत परता. मिक्सरमध्ये हे सर्व काढून घ्या.
आता कढईत सुक्या खोब-याचा किस घाला. मंद आचेवर चांगला लाल होऊ द्या. हेही मिक्सरम्ध्ये घ्या. कोथिंबीरीतला एक हिस्सा यात टाका. आता मिक्सरवर हे वाटण अगदी उगाळलेल्या चंदनसारखे गुळगुळीत वाटून घ्या.
1344398692613.jpg
आमटी :
मोठ्या भांड्यात तीन चमचे तेल तापत ठेवा. त्यात दालचिनीचे २ तुकडे टाका. हिंग टाका. गॅस बारीक करून हळद, तिखट आणि १/२ हिस्सा कोथिंबीर घाला. लगेच कांदा घाला. कांदा थोडा परतला, त्याचा रंग बदलला की मसूर घाला. परता. तेल सुटू लागले की त्यात वरचे तळके वाटण टाका. परता. पाणी घालण्याची अजिबात घाई करू नका. ८-१० मिनिटे बारीक गॅसवर परतत रहा. मिश्रण तेल सोडू लागले, रंग ब्राऊन झाला की त्यात आवश्यक तेव्हढे पाणी घाला. आता गॅस मोठा करा. एक उकळी आली की गॅस बारी करून झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजवा. भरपूर‍ परतले असल्याने ५ मिनिटात मसूर शिजतात.
आता झाकण काढून मसूर शिजला आहे ना हे तपासा. आता त्यात चवीपुरते मीठ टाका, २ बुटुक चिंच टाका. पुन्हा मंद गॅसवर ५ मिनिटे उकलत ठेवा. आता चिंचेची बुटुकं शोधून बाहेर काढा. मग आमटीत उरलेली किथिंबीर घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा. तयार आहे मसूरची आमटी उर्फ व्हेज मटण.
1344398716212.jpg
1344398737711.jpg
वाढणी/प्रमाण:
तीघांना पुरेल.
अधिक टिपा:
१. तळके वाटण ही सीकेप्यांची खासियत. प्रत्येक पदार्थानुसार यातले घटक काही प्रमाणात बदलतात. जेसे मटण असेल तर आलं, लसून जास्ती घेतले जाते शिवाय लवंग्-दालचिनी-मिरे अ‍ॅड होतात. मूगाचे बिरडे असेल तर आलं, गरम मसाला वगळले जातात, मसूराच्या आमटीला आलं-लसून दोन्ही कमी केले जातात, त्यात दालचिनी अ‍ॅड केली जाते, इ...
२. ही आमटी आंबोळ्यांबरोबर फर्मास लागते. तेव्हामात्र आमटीमध्ये पाणी जास्ती घालतात अन तिखटही वाढवतात.
३. वर सांगीतलेली आमटी तांदळाची भाकरी, फुलके, भात या बरोबर मस्त लागते. भात-आमटी, भाजलेला पापड अन लोणचे... वा !
४. श्रावणात आम्हा सीकेप्यांना मटणाचा फार विरह होतो. तो सोसायला ताकद म्हणून हे व्हेज मटण फार फार उपयोगी पडते डोळा मारा चव खरोखर मटणासारखी येते. फक्त परतायचा कंटाळा करता कामा नये स्मित
माहितीचा स्रोत:
पारंपारिक सीकेपी पदार्थ

Saturday, August 4, 2012

फुलके

लागणारे जिन्नस :

कणीक २ वाट्या
मीठ चवी पुरते
तेल २ चमचे
पाणी लागेल तेव्हढे

कृती :

कणीक, मीठ आणि १ चमचा तेल नीट एकत्र करावे. हळूहळू पाणी टाकून सैलसर भिजवावे. शेवटी १ चमचा तेल टाकून छान मळून घ्यावे. घट्ट झाकण लावून ५-१० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर पीठाचा हात लावून पुन्हा थोडे मळून घ्यावे.

आता बारीक गॅसवर तवा तापत ठेवावा. त्याला एक बोट तेल लावा, फडक्याने तवा नीट पूसून घ्या. यामुळे संपूर्ण तव्यावर तेलाचा एक पुसटसा थर होईल.

कणकेचा मुठीत मावेल इतका गोळा घेऊन हलक्या हाताने लागेल तेव्हढे पीठ लावून फुलका गोल लाटून घ्यावा. उलट पुलट करू नये. एकच बाजू वर घेऊन लाटावे.

आता तव्यावर थोडे पीठ भुरभुरवा. त्यावर फुलका लाटलेली वरची बाजू खाली जाईल अशी टाका. फुलका तव्यावर चिकटत नाहीये ना हे हलवून पहा. चिकटला असेल तर हलक्या हाताने सोडवून घ्या, उलटा करू नका. गॅस बारीकच ठेवा.

दुसरा कणकेचा गोळा घेऊन पीठात बुडवून लाटण्यासाठी तयार करा. आता तव्यावरचा फुलका उलटवा.
तुमचा लाटण्याचा स्पीड कमी असेल तर गॅस बारीकच ठेवा. आता पुढचा फुलका लाटा.

तो लाटून तयार झाला की गॅस मोठा करा. हळूच फुलका खालून लाल झालाय का ते पहा. फुलका हळूच उलटा करून, तवा गॅसवरून बाजूला घेऊन फुलका हळूच गॅसवर सोडा.
ही प्रोसेस जितकी हळूवार कराल तेव्हढी फुलका टम्म फुगण्याची शक्यता वाढेल :)

फुलका पूर्ण फुगला की गॅस बारीक करा, फुगलेला फुलका काढून खाली घ्या.

तयार आहे वरून शुभ्र पांढरा, खालून खरपूस, पूर्ण फुगलेला अन लुसलुशीत गरमा गरम फुलका.

कणिक सैलसर भिजणे, काही वेळ झाकून ठेवणे, लाटताना उलट्-पुलट न करणे, तव्याला फुलका न चिकटणे, गॅस कमी-जास्त करण्यातले कौशल्य, फुलका गॅसवर हळूवार टाकणे या सर्व पायर्‍या तुम्ही किती कौशल्याने करता यावर फुलका "जमणे" ठरते :)

व्हिडिओ :
 

रसपात्रा - गुजराती पदार्थ

लागणारा वेळ: १० मिनिटे
 
लागणारे जिन्नस:
अळूच्या उकडलेल्या वड्या ५ - ६
चिंचेचा कोळ अर्धी वाटी
गूळ एक मोठा - लिंबा एव्हढा खडा
तिखट १ चमचा
हळद पाव चमचा
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर
कढीपत्त्याची ४ -५ पाने
तेल २ चमचे
जिरे अर्धा चमचा
पाणी अर्धा कप
 
क्रमवार पाककृती:
पातेल्यात तेल टाकून तापत ठेवा.
त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यात कढीपत्ता टाका. हिंग टाका. तिखट, हळद, मीठ टाका. आता त्यात चिंचेचा कोळ टाका. गूळ टाका. पाणी टाका. कोथिंबीर टाका.
एक उकळी आली, गूळ नीट विरघळला की त्यात अळूच्या वड्या सोडा. उकळी आली की झाकण ठेऊन २ -४ मिनिटं शिजवा.
तयार आहे झणझणीत रसपात्रा.

1344067956967.jpg
 
वाढणी/प्रमाण:
दोघांना पुरेल
 
अधिक टिपा:
हे नुसतेच खायचे ( खरे तर ओरपायचे) जसे इडली सांबार खातो तसे. या नंतर मस्त मुगाच्या डाळीची खिचडी. आत्मा तृप्त स्मित