Saturday, July 29, 2017

मूगाच्या बिरड्याची पूर्वतयारी


 परवा रात्री मूग भिजवले. काल सकाळी उपसून ठेवले. काल रात्री बांधून ठेवले. आज सकाळी त्यांना छान मोड आले, ते असे
पाणी कोमट करून त्यात हे मूग घातले. अगदी हलक्या हातांनी जरा चोळले.
आता सगळे मोठ्या वाडग्यात टाकले अन त्यावर चाळणी दाबून ठेवली पाच मिनिटं ठेवा.
आता चाळणी बाजूला ठेवून 2-4 दा वाडगा ते भांडं असं हे सगळं कॉफी जशी वरखाली करत ओततो, तसं करा. मग वाडग्यावर चाळणी ठेऊन भांडं हलकेच हलवत हलवत वर आलेल्या सालांसकट पाणी ओतत रहा. ही प्रोसेस अगदी हळू करा. 
भांड्यातले पाणी संपले की चाळणी बाजुला करून वाडग्यातले पाणी पुन्हा भांड्यात उंचावरून टाका, पुन्हा वरचीच प्रोसेस करा. असे करत बरीचशी सालं आणि थोडे मूगही चाळणीत येतील. हे बघा असे, दऱियामें खसखस ; )
आता दरियातून खसखस बाजुला करा.
उरलेले बरेचसे शुभ्र मूग असे भांड्यात राहिले असतील.
आता हे मूग ताटात घ्या, शेजारी गाणीबिणी लावा अन सगळे मूग सोला. ही सालं आता खरंतर अगदी अलवार झालेली असतात. अगदी बोट लावलं तरी सुटून येतात. तुमचा हात ओला असू दे. प्रत्येक हिरव्या मूगाला हात लावत जादूने त्याला शुभ्र पांढरे करत जा.
अन बघा तुमच्या हातांची जादू!  ताटभर शुभ्र मोतीच मोती  :)


Saturday, December 24, 2016

भांडीकुंडी : विशाला म्युझियम

तर, स्वयंपाक करायला खूप आवडतो मला. पण समहौ भांड्या कुंड्यांचा काही शौक नाही. पण तरीही भांड्याकुंड्यांवरच लिहिणार आहे आज. अन तेही खूप भांडी, खूप मोठी भांडी यांवर!

नाही नाही, मी घेतली नाहीत भांडी; मी फक्त फोटो घेतले भांड्यांचे!
मधेच एक पिटुकली ट्रिप केली अहमदाबादला. नेहमी प्रमाणे आधी थोडी शोधाशोध केली, हटके, ऑफबिट काय आहे तिथे? तर त्यात या भांड्याकुंड्यांचा शोध लागला. अर्थात तरीही प्रत्यक्ष बघे पर्यंत अंदाजच आला नव्हता.

तर हे आहे अहमदाबाद येथील भांड्याकुंड्यांचं म्युझियम. इटुकपिटुक गडव्यापासून भल्या मोठ्या तांब्यापर्यंत, कातरी, सुपारी फोडायच्या अडकित्यापासून माणूस झोपू शकेल इतक्या कढई पर्यंत. पुरुषभर उंचीच्या रांजणापासून तीन पुरुष मावू शकतील अशा पेटाऱ्यासह.

हे सारे बघून फक्त अ ब ब इतकच!
त्या काळात स्वयंपाक करणाऱ्या बायका, पुरुष आचारी यांचे खरच कौतुक वाटले. एव्हढा मोठा स्वयंपाक करणे, ते घाटणे, ती भांडी उचलणे, घासणे वगैरे गोष्टी कशा करत असतील?

फुलपात्रांचे असंख्य आकार. पळ्या, देव, देवपुजेच्या वस्तू, यज्ञ-हवनाची पात्रे, गडवे, वाट्या, झार्‍या, पुरुषभर उंचीचा कालथा (उलथणे). इतकच नव्हे तर स्वयंपाक घरातल्या इवलुशा काड्यापेटीतल्या काड्यांनी तयार केलेला तीन फुटाचा ताजमहाल!

शिंकाळी, हुक्के, घुंगूरमाळा, काटे, चमचे, पराती, कढया,.... काय नाही असं नाही.
अगदी पेटारे, कुलपं किल्या - अगदी पाच फुटी कुलूपही!

अगदी वेता-धातूचे बैल, मुखवटे आणि गदाही ! लाकडी बाऊल्स, सट, मूर्ती...
दगडी भली मोठी परात ( शेजारची वाटी; आपली नेहमीच्या आकारातली आहे )
सगळ्यात आश्चर्यजनक, खरं तर बघून वाईटच वाटलं... पण चक्क हुंडा ज्यात भरून द्यायचा अशी हुंड्याचे डबे; लहानही आणि पाच फूट उंची आणि तितकाच घेर असणारे!

भारतीय पद्धतीचे जुने कुकर, पानाचे डबे (एक चक्क मोराच्या आकारातही), तबकं (ट्रे), चांदणीच्या आकाराच्या बैठकी,  मुर्त्या घडवलेला मोठा पितळी घडा, सुंदर रंगकाम करून भाजलेली भांडी,  पुरुषभर उंचीचा लोखंडी बाळकृष्ण,...
अन काय काय.

ही भांडी इतकी मोठी आहेत की त्यांच्यामागील नेहमीच्या उंचीचे दरवाजे आपल्याला बुटके वाटू लागतात अन शेजारचे सात फुटी रस्त्यावरचे दिवेही बुटके दिसू लागतात. अन मोठे वृक्ष झुडपं दिसू लागतात.

सर्वात जुने हजार वर्षांपूर्वीचे भांडेही दिसेल तुम्हाला.
अन घराच्या भिंती एव्हढी मोठी पसरट कढईही दिसेल. अन सहा फुटी वॉचमन इतका अन नंतर त्याहूनही मोठा जवळजवळ सात फुटी रांजणही. अन  जुन्या मोड्क्या यंत्रांपासून तयार केलेला यंत्र मानवही !

एकून नवल वाटतय? खरं नाही वाटत? बरं मग बघाच हे फोटो; सुरेंद्रभाई पटेल यांनी हे संग्रहालय उभं केलय,अहमदाबाद येशील "विशाला" इथे!


Tuesday, November 29, 2016

मसूरची खिचडी

साहित्य  :
तांदूळ २ वाट्या ( आंबेमोहोर सोडून  कोणताही )
मोड आलेले मसूर १ वाटी
कांदे ३
सुके खोबरे किसलेले - अर्धी वाटी
हळद, तिखट, मीठ , हिंग चवी प्रमाणे
दालचिनी, २ तुकडे
मिरे ५-६
लवंग ४-५
लसूण ६-७ पाकळ्या
तेल
ओले खोबरे, कोथिंबीर, लिंबू, साजूक तूप, पापड, लोणचे सोबतीसाठी

कृती  :
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत
मोड आलेले मसूर निवडून धुवून निथळत ठेवावेत
२ कांदे उभे चिरावेत, एक बारीक चिरावा
कढईत २ चमचे तेल टाकावे त्यात उभा चिरलेला कांदा मंद आचेवर परतावा. त्यातच दालचिनीचा १ तुकडा, सर्व लवंगा, सर्व मिरे, सर्व लसूण टाकावेत. कांदा चांगला तपकिरी झाला की ते सगळे मिक्सरमध्ये घ्यावे. आता त्याच कढईत सुके खोबरे भाजावे. चांगले लाल करावे. आता तेही मिक्सरमध्ये टाकावे. आता हे सगळे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे, थोडे पाणी टाकून गुळगुळीत वाटावे.
एकीकडे ४-५ वाट्या पाणी गरम करत ठेवावे. दुसरी कडे जाड बुडाचे पसरट पातेले आचेवर ठेवावे. त्यात ४ चमचे तेल टाकावे, त्यात एक दालचिनीचा तुकडा टाकावा. त्याचा खमंग वास आला की त्यात हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा परतावा. आता त्यात मसूर टाकावेत. त्यात हळद टाकावी. २ मिनिट परतावे. आता त्यात तांदूळ टाकावेत तेही २ मिनिट परतावेत. आता त्यात तिखट घालावे, वाटलेला मसाला टाकावा आणि सर्व मंद आचेवर ५-७ मिनिट छान परतावे. खमंग वास सुटला पाहिजे.
मग त्यात आधनाचे पाणी घालावे.
चांगली उकळी आली की मीठ टाकून उकळू द्यावे. पाणी आळत आले की आच बारीक करून झाकण घालून खिचडी शिजू द्यावी. सधारण १० मिनिटांनी आच विझवावी. त्यानंतर ५ मिनिट वाफ खिचडीतच जिरू द्यावी.
वाढताना खिचडीची मूद, त्यावर ओले खोबरे, कोथिंबीर, साजूक तुप, लिंबू ठेवावे. बाजूला पापड, लोणचे वाढावे .  

Monday, August 8, 2016

सोपे बेसिक चिकन (विद्यार्थ्यांसाठी)

 साहित्य :
चिकन 500 ग्रॅम
दही 3 चमचे
लसूण 10 पाकळ्या
आलं एक इंच
तिखट 1¹/² चमचे,
हळद ¹/² चमचा
मीठ 1चमचा
मसाला 1¹/² चमचा ( बडिशेप, धणे, लवंग, मिरे, दालचिनी यांची पूड)
तेल 3-4 चमचे
कांदे मोठे दोन
टॉमेटो 2

कृती:

1. चिकन स्वच्छ धुवून, निथळून त्याला दही, हळद, तिखट, मीठ लावून घेणे.

2. लसूण, आलं, चॉप करून, त्यात मसाला एकत्र करून तो लावून घेणे.

3. कांदा, टॉमेटो चॉप करणे.

4. पॅन मधे तेल तापवून त्यात कांदा लाल होई पर्यंत परतणे.

5. टॉमेटो परतणे,  मग दोन मिनिटं झाकण ठेवणे.

6. नंतर पुन्हा तेल सुटे पर्यंत परतणे.

7. आता चिकन टाकून परतणे. तेल सुटेपर्यंत परतणे. हवे तेव्हा गॅस लहान, मोठा करणे.

8. आता दिड कप पाणी, लागले तर अजून टाकून, छान उकळी आणणे.

9. खळखल उकळले की गॅस बारीक करून झाकण ठेऊन शिजवणे.

10. दर पाच मिनिटांनी हलवणे. हवे तर पाणी अजून अर्धाकप घालणे.

11. साधारण 20 मिनिटांनी चिकन शिजेल.

12. शेवटी चव चाखून बघणे. तिखट मीठ अॅडजेस्ट करणे.


फोटो:
ह्या  कृतीने माझ्या लेकाने केलेल्या चिकनचा फोटोThursday, June 2, 2016

चिकन बिर्याणी


साहित्य :
एक किलो चिकन, तीन वाट्या दिल्ली राईस, तमालपत्र 2-3, मसाला वेलची एक, साधी वेलची3-4, मिरे 8-10, काजु 10-12( पाकळ्या सुट्या करून घ्या), उभे चिरलेले मोठे4-5 कांदे, पुदिना किमान चार मुठी, दही 3 मोठे चमचे, आलं लसूण पेस्ट 3 चमचे, हळद, तिखट, मीठ, तंदुर मसाला दिड चमचा, तेल तळणासाठी, साजुक तूप 4 चमचे, एक टॉमेटो बारीक चिरून, कप भर दूध, 8-10 केशराच्या काड्या
कृती: 

दिल्ली राईस तांदूळ  भिजवून निथळत ठेवा. (माझ्याकडचा दिल्ली राईस संपलेला म्हणून बामती वापरला. पण त्यात मजा नाही)
कांदे उभे चिरून रुमालावर पसरून ठेवा

पुदिना धुवून बारीक चिरून ठेवा

चिकन धुवून त्याला दही, हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, थोडा पुदिना, दिड चमचा तंदुर मसाला लाऊन ठेवा
कांदा तेलात तळायला घ्या

दुसरीकडे पसरट भाड्यात, 3 चमचे साजुक तुपात तमालपत्र, मिरे, मसाला वेलची, साधी वेलची, काजू परतून घ्या

त्यावर निथळत ठेवलेले तांदूळ परता. आधण आणि मीठ टाकून भात मोकळा शिजवून घ्या

शिजलेला भात परातीत निवत ठेवा. याच वेळेस तमालपत्र, मिरे , मसाला वेलची, साधी वेलची वाटलं तर काढून टाका
पसरट मोठ्या पातेल्यात 3 चमचे साजूक तुप टाकून बारीक चिरलेला टॉमेटो परता

त्यावर मॅरिनेटेड चिकन चांगले परता

आता अर्धे चिकन बाऊलमधे काढून ठेवा आणि उरलेल्या चिकनवरती तळलेला 1/3 कांदा टाका
त्यावर अर्धा भाग भात पसरा, वर पुदिना1/3 भाग पसरा

त्यावर 1/3 कांदा, बाजुला काढून ठेवलेले चिकन, उरलेला कांदा, उरलेला पुदिना पसरा

आता बाजूला ठेवलेला भात पसरा

ज्या बाऊलमधे चिकन काढून ठेवलेले त्यात अर्धाकप दूध ओता. भांडे निपटून घ्या. त्यात केशर टाका. हे दूध बिर्याणीवरती पसरा
कणकेमधे पाणी घालून भिजवा


बिर्याणीवरती घट्ट झाकण ठेऊन झाकण-भांड याच्या फटीवर कणीक लावा. पाण्याचा एक हात फिरवा.
खाली जाड तवा ठेऊन बारीक आचेवर किमान एक ते दिड तास ठेवा. नंतर गॅस बंद करून 15 मिनिटांनी बिर्याणी ताटात वाढून घ्या
6-8 जणांसाठी भरपूर होईल.